पुणे - रांजणगाव औद्योगिक नगरीचा झपाट्याने विकास होत असताना जमिनीचे बाजारभाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे रांजणगाव औद्योगिक परिसरात गुंडगिरी, अवैध दारूविक्री, ऑनलाइन बिंगो मटका असे अवैध व्यवसाय सुरू आहेत. या अवैध उद्योगांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. यात 21 जणांना अटक करत 6 लाख 66 हजार 614 रुपयांचा माल जप्त केला आहे.
रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध दारुसाठा बाळगून त्याची विक्री केली जात आहे. तसेच ऑनलाईन बिंगो (ऑनलाईन मटका) ही मोठ्या प्रमाणात खेळला जात असून मिळालेल्या माहितीवरून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ऐश्वर्या शर्मा उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड आणि बारामती गुन्हे पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकांनी एकाच वेळी वेगवेगळ्या पाच ठिकाणी छापे मारले. यात 1 लाख 25 हजार 380 रुपयांची रोख रक्कम व 2 लाख 22 हजार रुपये किंमतीचे मोबाईल, 4 कॉम्प्युटर संच, एलसीडी स्क्रीन, 2 सीसीटीव्ही डीव्हीआर, टेबल, खुर्च्या व इतर साहित्य असा 3 लाख सत्तेचाळीस हजार 380 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हॉटेल संदीप व एसवन अशा दोन्ही हॉटेलवर अवैध दारूविक्री होत असताना 28 हजार 570 रोख रक्कम, 2 लाख 90 हजार 664 रुपये किमतीची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली. या दोन्ही हॉटेलवर झालेल्या कारवाईत 21 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा- डॉ. कोल्हेंनी किल्ल्यातल्या बाभळी आधी काढाव्या -पर्यटनमंत्री रावळ
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अवैध व्यवसायांवर पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पुढील काळात असे अवैध व्यवसाय सुरू राहिल्यास मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.