पुणे - बावधन येथे स्वाती मिश्रा या महिलेने मोटारीने भरधाव वेगात दुसऱ्या गाडीला धडक दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी संबंधित महिलेला तिचे पती हिंजवडी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मात्र, तिथेही या महिलेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या अंगावर धावून जात धिंगाणा घातला. दरम्यान, सदर महिला मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्वाती यांना शांत करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या बाहेर आणण्यात आले. त्यानंतरही महिलेने पोलीस आणि लष्कराला अश्लील शिवीगाळ केली. या घटनेमुळे रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला होता. गाड्यांना धडक दिल्याप्रकरणी चौकशीसाठी बुधवारी सकाळी पोलीस कर्मचारी महिलेच्या घरी गेले होते. तेव्हा, महिलेने त्यांना हुसकावून लावत अश्लील शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला होता.
संबंधित महिलेने त्यावेळी मद्यपान केले नसल्याचे हिंजवडी पोलिसांनी स्पष्ट केले आहे. महिलेचा पती बँकेत नोकरी करत असून स्वाती गृहिणी आहे. तिने हा प्रकार का केला या मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.