पुणे - पुणे शहरात कोरोना पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे सोमवारपासून (14 जून) कोरोनामुळे लादलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. त्याचे रितसर आदेश सोमवारपासून लागू होणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचा पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांवर असल्यामुळे तिथे फारसा बदल होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील विधान भवन येथे कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
- शहरातील दुकाने जी आतापर्यंत 4 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी होती. ती वेळ वाढवून आता 7 वाजेपर्यंत दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
- वाचनालय आणि अभ्यासिका उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
- सिनेमागृह आणि नाट्यगृहाबद्दल पुढच्या आठवड्यात आढावा घेतला जाईल. जी काही परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
- दिव्यांग नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली. आजपासून त्याला सुरुवात करण्यात आली आहे.
- परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे आदेशही काढण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे लवकरात लवकर लसीकरण केले जाणार आहे.
तर, पिंपरी-चिंचवड शहराचा पॉझिटिव्हीटी दर अजूनही 5.8 टक्क्यावर आहे. जोपर्यंत हा दर 5 टक्क्यांच्या आत येत नाही. तोपर्यंत या ठिकाणी आहे तेच नियम लागू राहणार आहेत. पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी दर 5.5 टक्के इतका आहे. सोमवारपर्यंत तो 5 टक्क्यांच्या खाली येईल. त्यानंतर ही नवीन नियमावली लागू केली जाईल. पुणे ग्रामीण भागाचा पॉझिटिव्हीटी दर 12 टक्के इतका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नियमांमध्ये बदल होणार नाहीत, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
हेही वाचा - यंदाही 'बा विठ्ठला'ची पायी वारी नाहीच! मानाच्या दहा पालख्याच बसने जाणार पंढरीला