पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे उद्योगधंदे, व्यापार ठप्प झाले. तर अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. मात्र, अशा या महासंकटाच्या काळात पुण्यातील दोन तरुणांनी तब्बल 400 हून अधिक जणांना रोजगार मिळवून दिला आहे.
पुण्यातील मनीष ठाकरे आणि मनोज कदम -
मनीष ठोकरे आणि मनोज कदम हे दोघे ग्रामीण भागातून येतात. मनीष हा विदर्भातून असून मनोज हा मराठवाड्यातून आला आहे. मात्र, आता कामानिमित्त दोघेही पुण्यात राहतात. त्यांनी स्वतःच्या समस्या बघितल्या, अनुभवल्या त्या समस्या पुढे येणाऱ्या मुलांना यायला नको या उद्देशाने 2016 पासून काम चालू केले. याच माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये सर्वाधिक कामावर भर देत ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहे, ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे अशा जवळपास 400हून अधिक मुलांना त्यांनी स्वतः विविध ठिकाणी मार्गदर्शन करून, प्रशिक्षण देऊन करार असलेल्या कंपनीमध्ये पाठवले.
हेही वाचा - आमदार पडळकरांच्या भावासह १२ जणांवर गुन्हा दाखल, सांगली जिल्ह्यात मंदिरात चप्पल घालून आल्याचा वाद
एक रुपयाही न घेता पूर्णपणे मोफत मदत -
मनिष आणि मनोज आज या कठीण कोरोनाकाळात मुलांकडून एक रुपयाही न घेता पूर्णपणे मोफत मदत करत आहेत. स्वतःची नोकरी, घर सांभाळून अशा कठीण काळात मुलांना मुलाखत कशी द्यावी, रिझ्युम कसा असावा, नोकरी कुठे शोधावी, तसेच संदर्भ कसे मिळवावे, या टिप्स अगदी सोप्या आणि सहज भाषेतून ते पोहोचवत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून 25 हजार तरुणांशी जोडले गेलेत -
सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जवळपास 25 हजार तरुण यांच्याशी जोडले गेले आहेत. यातील काही जणांना नोकऱ्या लागल्या आहेत. तर अगदी ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांनाही आज चार पैसे कमावण्याची संधी मिळाली आहे.
हेही वाचा - आ. भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागावी - निलेश राणे
ग्रामीण भागातील मुलांना नोकरीसाठी तयार करतो -
ग्रामीण भागातील युवकांकडे कौशल्य असते. मात्र, नोकरीसाठी मुलाखत कशी द्यावी, रिझ्युम कसा असावा, हे बहुतेक तरुणांना माहीत नसते. म्हणून आम्ही ग्रामीण भागातील या तरुणांशी जोडून त्यांना मुलाखतीसाठी त्यांना तयार करतो. तसेच त्यांना लवकरात लवकर नोकरी कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करतो, असे मनोज कदम म्हणाला. तर जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर आपण कुठलेही काम तसेच समाजसेवा करू शकतो हेच मनीष ठाकरे आणि त्याच्या मित्राने करुन दाखवले आहे.