पुणे - समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल करत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसांईंनी आझमींवर टीका केली. तसेच आझमी यांना जर महाराष्ट्रात राहायचे असेल तर त्यांनी महिलांचा सन्मान केलाच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते अबू आझमी?
राज्यात सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा संदर्भ घेऊन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महिलांच्या संदर्भामध्ये वक्तव्य केले होते. 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे आणि नंतर बलात्कार झाला म्हणून केस करायची, अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याला महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी आक्षेप घेतला आहे.
राज्यातील एका मंत्र्यावर आरोप होत आहेत. तसेच एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप झाला, यासंदर्भात पोलिसात तक्रार देऊनही कोणतीही कारवाई दोन्ही प्रकरणात होताना दिसत नाही. एकंदरीतच या प्रकरणातील पीडितांना बदनाम करण्याचे काम केले जात आहे, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - महागाईचा 'कळस': नऊ दिवसात पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महाग
या अडचणीत आलेल्या मंत्र्यांना पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम त्यांचे काही सहकारी आता करायला लागले आहेत. आमदार अबू आझमी यांचे वक्तव्यही अशाच प्रकारचे असून ते अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे अबू आझमी यांचे डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न त्यांना विचारावा लागेल. तसेच त्यांनी महिलांचा अपमान का करत आहेत? त्यांनी महिलांची माफी मागितली, अशी मागणीही केली.