पुणे - शहरात यापूर्वी मेट्रोचा मार्ग स्वारगेट ते पिंपरी असा होता. मात्र, नागरिकांच्या भावना लक्षात घेता हा मार्ग वाढविण्यात आला आहे. आता तो निगडी ते कात्रज असा होणार आहे. या मार्गाचे नाव पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो असे करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या दृष्टीने प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची बैठक झाली. यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, शिवजयंतीसाठी नगरपालिकेला निधी देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले आहे. तसेच नव्याच्या नऊ दिवसांसारखी आजची बैठक नाही हे मी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे. दर आठवड्याला याचा आढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले. हायपरलूपचा प्रकल्प जगात कुठेही झाली नाही. हा प्रकल्प आधी 10 किमी तर होऊ द्या. जर तिकडे यशस्वी झाला तर आपल्याकडे त्याची ट्रायल घेण्यात येईल. हा प्रकल्प सध्यातरी शक्य नसल्याचे मंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - संजय राऊत यांची हकालपट्टी करा; संभाजी भिडेंची मागणी
मुंबईप्रमाणे पुणे मेट्रोचाही विस्तार होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे मेट्रोच्या आढावा बैठकीत मंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोचा विस्तार करणार असल्याची घोषणा केली. मेट्रोचे प्रस्तावित सहा कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने सुरु करण्याऐवजी सगळ्या कॉरिडॉरचे काम एकत्र सुरू करण्याचे आणि डीपीआर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्वारगेट ते पिंपरी या मार्गावरील मेट्रोचे नाव बदलून 'पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो' असे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आता पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्ग वाढवून निगडी-कात्रज होणार आहे. वनाज-रामवाडी मार्ग वाढवून चांदणी चौक ते वाघोली असा होणार आहे. शिवाजीनगर-हिंजवडी हा पीएमआरडीए करत असलेला मेट्रोचा मार्ग शिवाजीनगर-माण असा वाढवणार आहे.
हेही वाचा - भिडेंचा बंद हे राजकीय षडयंत्र - सुप्रिया सुळे
हडपसर-स्वारगेट हा मार्ग नव्याने प्रस्तावित करण्यात आला आहे. निगडी-चाकण मेट्रो मार्गाची चाचपणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच खडकवासला ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग देखील प्रस्तावित आहे. वारजे ते शिवाजीनगर या मार्गाचा विचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुण्यातील एचसीएमटीआर (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिस्ट रूट) 24 मीटर ऐवजी 8 मीटर होणार आहे.
हेही वाचा - वाशिम जिल्ह्यात 'महिलाराज'... सर्व पंचायत समितींवर महिला 'कारभारणी'