पुणे - सार्वजनिक कार्यक्रमांवर उपजीविका अवलंबून असलेल्या चार ते पाच लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने याचे गांभीर्य ओळखून जाहीर कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे साऊंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनने (पीएसईजीईईव्हीए) पत्रकार परिषदेत केली. यासाठी बुधवारी धरणे आंदोलन केला जाणार आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी, सोमनाथ धेंडे, शिरीष पाठक, सूर्यकांत बंदावणे, शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे गेले सात महिने कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम झाले नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर 'अनलॉक'मध्ये इतर व्यवसायांना टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ, सांस्कृतिक सभागृहे, थिएटरमधील कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यासंबंधित क्षेत्राशी संबधीत काम करणारे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, कलाकार, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफेर्स, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर, डी. जे. असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे अनेक जणांचे काम गेले आहे असून मोठे आर्थिक संकट आले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी यांनी दिली. त्यामुळे सरकारदरबारी आमच्या समस्या मांडण्यासाठी, तसेच कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर व्यवसायांप्रमाणे अटी-शर्थींसह आम्हालाही व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. आम्हाला कोणतीही आर्थिक मदत नको, केवळ आमचा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. त्यातून आमची उपजीविका भागू शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांच्या बँक कर्जाचे हप्ते भरण्यास शिथिलता द्यावी, कारण आमच्या व्यवसायाला परवानगी मिळालेली नाही तर बँकेच्या हफ्ते भरणार कसे? हा एक प्रश्न आमच्यासमोर आहे. वाहतुकीसंदर्भात गाड्यांचे पासिंग, वीमा, करभरणा याबाबत सवलत मिळावी. सर्व तंत्रज्ञांना कलाकारांचा दर्जा मिळावा. व्यावसायिकांना त्यांच्या मुलांच्या शाळा व कॉलेजच्या फीमध्ये सवलत मिळावी. व्यावसायिकांना आपले साहित्य ठेवण्यासाठी महानगरपालिका हद्दीत जागा किंवा गाळे नाममात्र भाडेतत्वावर उपलब्ध करून द्यावेत. तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या कलावंतांचा आरोग्य विमा शासनाने काढून द्यावा. कलाकार, तंत्रज्ञ कल्याण मंडळांची स्थापना करावी, अशा विविध मागण्या असोसिएशनच्या आहेत.