पुणे: जुनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणारा पाऊस या वर्षी अर्धा जुलै महिना संपता तरी सुरु झालेला नाही. समाधानकारक पाऊस न झाल्या मुळे महाराष्ट्रात सगळीकडेच चिंता व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात पुणे शहरात चांगला पाऊस पडतो असे पहायला मिळते. यावर्षी पाऊस लांबल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी पाऊस यावर्षी पडला आहे.
यावर्षी जून महिन्यात 83.9 मीमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षातील जून महिन्यातील सर्वात कमी पाऊस नोंदवला गेला आहे. 2014 मध्ये पावसाचे प्रमाण 13.8 मीमी होते, तर 2022 मध्ये 35 मिमीची नोंद झाली होती.जुलै महिन्यातले पंधरा दिवस संपले असून आतापर्यंत केवळ 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही गेल्या दहा वर्षातली सर्वात कमी सरासरी आहे असे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने यावर्षी पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार पाऊस कमी झालेला दिसत आहे .
मान्सून उशिरा दाखल झाल्यानंतर जून मध्ये पावसाला जोर नव्हता .जुलै महिन्यात तरी पाऊस होईल अशी अपेक्षा होती. अर्धा महिना संपला तरी पाऊस न झाल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये पावसाचा भरोसा राहिलेला नाही .पुणे शहरातील पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला आहे. शिवाजीनगर मध्ये वजा 46% ,पाषाण मध्ये वजा 30 %, लोहगाव 20 %टक्के, पाऊस आहे. परंतु येत्या काही आठवड्यात ही सरासरी भरून निघणार असल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणेचे विभाग प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
एकीकडे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणा मधला पाणीसाठा सुद्धा आता कमी कमी होत आहे. त्यामुळे शहरावर पिण्याच्या पाण्याचे सुद्धा संकट येऊ शकते. पाऊस पडत नसल्याने शेतकरी नागरिक आणि व्यापारी सुद्धा चिंताग्रस्त आहेत .त्यामुळे समाधानकारक पावसाची सर्वच वाट पाहत असल्याचे चित्र सध्या आहे. पुढिल आठवड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत असल्यामुळे आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :