पुणे - सध्याच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण असलेला एन-95 मास्कची सुवर्ण कलाकृती रांका ज्वेलर्सने घडविलेली आहे. या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे आत्ता तुम्ही हा मास्क म्हणून वापरू शकता आणि नंतर नेकलेस म्हणूनही परिधान करू शकता. 22 कॅरेट सोन्यामध्ये घडविण्यात आलेल्या या नेकलेस (चोकर) कम गोल्डन मास्कचे वजन 124.5 ग्रॅम असून रांका ज्वेलर्सच्या एका प्रतिष्ठित ग्राहकाला हा मास्क नुकताच सुपूर्त करण्यात आला आहे.
ज्वेलर्समध्ये आम्ही कायमच नाविन्यता आणि ग्राहकांचे समाधान यावर विशेष भर देतो. प्रत्येक काळात सर्वोत्कृष्ट गुणवत्ता, कल्पक डिझाईन आणि ग्राहकांच्या आनंदाला आमच्याकडे प्राधान्य असते. त्यामुळेच विशेष अपेक्षा घेऊनच ग्राहक आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांची 100 टक्के अपेक्षापूर्ती करतो. यापूर्वीही रांका ज्वेलर्सने सोन्याचा शर्ट, सोन्याची पैठणी आणि सोन्यातली शालही घडवून आपल्या प्रतिभेचा आविष्कार सर्वांना दाखविला आहे. पुण्यातल्या मानाच्या गणपती बाप्पासाठीही चांदीचे सुबक सिंहासन घडवून भक्तांना आनंदित केले आहे.
आत्ता आम्ही घडविलेला नेकलेस (चोकर) कम गोल्डन मास्क हे आमच्यासाठी तसे आव्हानच होते. यासाठी आमच्या कारागिरांनी 22 कॅरेट सोन्याचा वापर करत मोठ्या हस्त कलाकुसरीने हा मास्क घडविला असून तो पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतो. याचे वजनही 124.5 ग्रॅम इतके अल्प ठेवण्यात आम्हाला यश मिळाले. एवढेच नव्हे तर हा सोनेरी मास्क लवचिक असून कोणत्याही व्यक्तीला व्यवस्थितपणे परिधान करता येऊ शकतो. या मास्कमधून श्वास घेता यावा यासाठी सोन्याच्या बारीक जाळ्यांची खास निर्मिती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे डिझाईन हे टर्किश स्टाईलमध्ये पाहावयास मिळते. हा मास्क स्वच्छ करण्यासाठी आम्ही खास असा ‘युव्ही सॅनिटायझर बॉक्स’ ग्राहकांना भेट म्हणून देतो, अशी माहिती रांका ज्वेलर्सचे ज्वेलरी डिझायनर श्लोक रांका यांनी दिली.
मास्क व नेकलेसची (चोकर) संगम असलेली ही सुंदर कलाकृती बनविण्यासाठी कारागिरांना 2 आठवडे लागले. या अप्रतिम आणि अद्वितीय सोनेरी मास्कची किंमत 6.5 लाख रुपये इतकी आहे. रांका ज्वेलर्सच्या बंडगार्डन शोरूममधील कलाकारांच्या टीमने ही अनोखी किमया घडवलेली आहे.
हेही वाचा - शिरूर महसूल पथकाने घोडनदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या बोटी केल्या नष्ट
हेही वाचा - भारतात मोठा घातपात घडवणार होते पुण्यात अटक केलेले दोन आरोपी, एनआयएचा खुलासा