पुणे - एकतर्फी प्रेमातून युवतीला रस्त्यात आडवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत समोर आला आहे. भिगवण रस्त्यावरील सिटी इन चौकात संबंधित तरुणीला ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. याप्रकरणी मंगेश रामचंद्र अडसूळ या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अडसूळ याने संबंधित युवतीच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेतली. नोकरीच्या निमित्ताने बारामतीत राहणाऱया 22 वर्षाच्या युवतीने यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. भिगवण रस्त्यावरील तांबेनगर या ठिकाणी संबंधित युवती वस्तव्यास आहे.
अडसूळचे या युवतीवर एकतर्फी प्रेम आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भिगवण रस्त्यावरील सिटी इन चौकात त्याने युवतीला आडवले. प्रतिसाद देत नसल्याचे पाहून तिच्या श्रीमुखात मारली. तसेच जबरदस्तीने ओढून नेण्याचा प्रयत्न केला. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे देखील तक्रारीत नमूद आहे. तक्रारीनंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.