पुणे - राज्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मागील दोन दिवसांपासून पाऊस ओसरला असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र आता यानंतर आव्हान असेल रोगराईचे, या रोगराई पासून बचाव करण्यासाठी डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी काही खास टिप्स ईटीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी सांगितल्या आहेत.
पूर परिस्थिती असताना आणि पूर परिस्थिती ओसरल्यानंतर अनेक साथीचे आजार पसरतात. यामध्ये प्रामुख्याने कॉलरा, हिवताप, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, उलट्या, जुलाब, टायफॉईड, स्वाइन फ्ल्यू यासारखे आजार पसरत असतात. साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया हे आजार पसरतात. या रोगांपासून बचाव करण्यासाठी काही खास गोष्टी अविनाश भोंडवे यांनी सांगितल्या आहेत.
रोगराई पासून बचावासाठी काय करावे....
- पाणी पिताना फिल्टरचे पाणी प्यावे किंवा चार पदरी फडक्याने पाणी गाळून उकळून घ्यावे. त्यानंतर गार करून ते पाणी प्यावे.
- हॉटेल, रेस्टॉरंटमधील पाणी पिण्याचे टाळा, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचे टाळा. बाहेर जाताना घरातून पाणी घेऊन जावे.
- उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे, कारण त्यातून रोगराई पसरते.
- पावसात सतत भिजू नये. भिजल्यानंतर लवकरात लवकर अंग कोरडे करा, अन्यथा सर्दी खोकल्यासारखे आजार होतात. शिवाय फंगल इफेक्शन, पायाला चिखल्या, गजकर्ण यासारखे आजार पसरत असतात.
- पावसाळ्यात ढगाळ हवामानामुळे न्यूमोनिया, सर्दी खोकला स्वाइन फ्ल्यू यासारखे आजार पसरत असतात. हे साथीचे आजार आहेत. हे आजार ज्यांना आहेत त्यांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- शाळेत जाणाऱ्या मुलाला ताप असेल आणि त्याला बरे वाटत असेल म्हणून लगेच शाळेत पाठवू नका, कारण अर्धवट बऱ्या झालेल्या मुलांपासून इतर मुलांना हा आजार होऊ शकतो.