पुणे - शहराजवळील चासकमान जलाशयाच्या जवळ गुंडाळवाड, बुरसेवाडी (बीबी) येथे असणाऱ्या डोंगरावर श्री शिव शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी डोंगराची उंच चढण पार करत मोठी गर्दी केली आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त येथे भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
भीमा नदीच्या काठावर असणाऱ्या श्री शिव शंभू महादेवाच्या डोंगराची एक वेगळी आख्यायिका आहे. हा डोंगर हा शिवलिंगासारखा दिसतो. आज श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भीमाशंकरला जाणारा प्रत्येक भाविक श्री शिव शंभू महादेवाचे दर्शन घेऊनच पुढे जात आहे. चिमुकल्यांसह, वयोवृद्ध नागरिक, तरुण असे सर्वजण एक किलोमीटर उंच डोंगर कड्यावर वाट काढत श्री शिव शंभू महादेवाच्या दर्शनाला जात आहेत.
शिव शंभू महादेव मंदिराचा इतिहास -
भीमा नदीच्या काठावर असणाऱ्या शंभू महादेवाच्या डोंगरावर पूर्वीच्या काळी एक शिकारी डुकराची शिकार करत असताना त्याला शिव शंभू महादेवांचे शिवलिंग पाहायला मिळाले. त्यानंतर अठराव्या शतकात अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकरच्या रस्त्यावर असणारा हा डोंगर मोठा पवित्र मानला जातो. त्यामुळे शिव शंभू महादेवाचे मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.