पुणे - कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून स्थानिक पातळीवर पुणे महापालिका, जिल्ह्याच्या पातळीवर पुणे जिल्हा परिषद आणि राज्याच्या पातळीवर आरोग्य विभाग कोरोना संदर्भातील दैनंदिन आकडेवारी प्रसिद्ध करत असतात. पुण्यातील आरोग्य यंत्रणा चांगले काम करत असून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवीत असताना राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आकडेवारीत तफावत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीत असलेल्या त्रुटींमुळे पुण्याची नाहक बदनामी होत असून यंत्रणेचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. तसेच आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध होणारी आकडेवारीतील त्रुटी दुरुस्त करावी, असे पत्रही महापौरांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे.
आकडेवारीत घोळ -
उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या 5 मे यादिवसाच्या आकडेवारीमध्ये पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड ग्रामीण अशा एक लाख 14 हजार 254 सक्रिय रुग्ण दाखविण्यात आले आहेत. मात्र, याच दिवशी जिल्हा परिषदेच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 96 हजार 685 इतके सक्रिय रुग्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. या आकडेवारीतील तफावतीमुळे पुण्यात 17,569 अधिकचे सक्रिय रुग्ण असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे पुण्यातील रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. मात्र, प्रत्येक्षात तस नाही. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा - सुप्रीम कोर्टाला मुंबईतील स्थिती माहिती आहे का? - संदीप देशपांडे
25 दिवसात जवळपास 26 हजार रुग्ण कमी -
राज्यासह पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. मात्र, 18 एप्रिलपासून पुणे शहरातील कोरोना रुग्णवाढीची संख्या ही कमी कमी होत चालली आहे. दररोज नवीन मिळणाऱ्या रुग्णांच्या संख्येपैकी कोरोनाने बरे झालेल्याची संख्या अधिक आहे. 18 एप्रिलला पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 56 हजार 500 इतकी होती. तर काल (सोमवारी) पुण्यात 30 हजार 500 सक्रिय रुग्ण आहेत. 25 दिवसात जवळपास पुण्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 26 हजारने कमी झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे.
उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या आकडेवारीमुळे पुण्यात मुंबईपेक्षा सक्रिय रुग्णांची संख्या दुप्पट असल्याचे चित्र दिसत आहे. ही वस्तुस्थिती नसून पुण्यातील रुग्णसंख्या मुंबईपेक्षा कमीच आहे. पुण्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून सादर करण्यात येत असलेल्या आकडेवारीमुळे पुण्यातील यंत्रणांचे खच्चीकरण होत असून शहराचीही बदनामी होत आहे. त्यामुळे आपल्या विभागातील अधिकार्यांना याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती देखील आरोग्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा - विरोधी पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे - विजय वडेट्टीवार