पुणे - हुंडा न दिल्याच्या कारणावरून कर्नाटकात अत्यंत क्रूरपणे सुनेची हत्या करून पुण्यात नातेवाईकांकडे लपून बसलेल्या सासू-सासऱ्यासह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुढील तपासासाठी त्यांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. परवीन फकरूद्दीन कालेकोटे (26) असे मृत महिलेचे नाव आहे तर, अशपाक फकरूद्दीन कालेकोटे (46) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूर (कर्नाटक) येथे पती अशपाक याने 6 जून रोजी आपली तिसरी पत्नी परवीन हिच्या गुप्तांगात लोखंडी सळ्या घालून आणि गळा आवळून अतिशय निर्घृणपणे तिचा खून केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कर्नाटक राज्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोर्चे काढून घटनेचा निषेध केला होता. तर काही ठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागल्याची माहितीही पोलिसांनी दिली. कर्नाटक पोलिसांनी आरोपी पतीला तेव्हाच अटक केली होती. तर, सासू, सासरा, दीर आणि आणखी दोघे फरार झाले होते.
दरम्यान मृतक महिलेचा फरार असलेला सासरा फकरूद्दीन, सासू रहमतबी, जाऊ आसमा, दीर अल्ताफ आणि इतर दोघे पुण्यात नातेवाईकांकडे लपल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी वानवडी पोलिसांच्या मदतीने आरोपी अल्ताफ याला सय्यदनगर येथून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत इतर आरोपी कोंढाव्यातील कौसरबाग परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून इतर आरोपींनाही अटक केली. पुढील तपासासाठी या आरोपींना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.