पुणे - कोंढव्यातील अल्कान स्टायलश या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अल्कान स्टायलश सोसायटीची इमारत बांधणाऱ्या विकासक अग्रवाल बंधूसह आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील विपुल आणि विवेक अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकांना कोंढवा पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. त्यांना आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सुनावणीनंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस रामदिन यांनी २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडी मिळण्याची कारणे
1) कोसळलेली भिंत 2013 साली बांधलेली आहे. ती भिंत कधीही कोसळू शकते, असे अल्कोन सोसायटीच्या सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही सदर विकासकाने दुर्लक्ष केले.
2) आरोपीकडून इमारत बांधकामाचे नकाशे आणि इतर कागदपत्रे मिळवायची आहेत. पडलेल्या भिंतीच्या बांधकामाचा परवाना कुणाला दिला होता? याची माहिती मिळवायची आहे.
3) अटकेत असलेले आरोपी हे इतर फरार आरोपीविषयी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्याविषयी तपास करायचा आहे.
4) वरील गुन्ह्यात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने त्यांच्याकडे तपास करावयाचा आहे. त्यामुळे पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
आरोपीचे वकील संजय अगरवाल यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना ही दुर्घटना जमीन ढासळल्यामुळे घडली असल्याचे सांगितले. त्यामुळे बांधकाम व्यासायिकाची यामध्ये चूक नाही. त्यांनी केलेले बांधकाम अधिकृत आहे. त्याची कागदपत्रे उपलब्ध आहेत. काही चौकशी करायची असल्यास ते पोलिसांना सहकार्य करतील. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती.