पुणे - पदवीधर मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी गर्दी केल्याचे चित्र पुण्यातील कौन्सिल हॉल येथे पाहायला मिळाले. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
संग्राम देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच जनता दलाचे शरद पाटील, मनसेच्या रुपाली पाटील, अपक्ष म्हणून इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनीदेखील अर्ज दाखल केला. यासोबतच संभाजी ब्रिगेडने देखील आपली उमेदवारी जाहीर केली असून संभाजी ब्रिगेडचे मनोजकुमार गायकवाड यांनी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलमधील नेते प्रताप माने यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत कागलमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र उपस्थित होते. तसेच कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी यंदा मोठी चुरस
राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी दिली जाईल, असा दावा प्रताप माने यांनी यावेळी केला. एकंदरीतच पुणे पदवीधर मतदारसंघासाठी यंदा मोठी चुरस दिसून येत असून पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण किती उमेदवार रिंगणात असतील, हे उद्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.