पुणे - हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असतानाही कामावर येणे एका कमचाऱ्याला चांगलेच महागात पडले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच्यावर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.
पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अभियंता पुणे स्टेशन परिसरातील एका कंपनीत कामाला आहे. दिल्लीवरून आल्यानंतर त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला होता. अशा परिस्थितीत त्याने 14 दिवस घरी राहणे आवश्यक होते. परंतु, हा कालावधी पूर्ण होण्याआधीच तो कामावर रुजू झाला.
कार्यालयात गेल्यावर त्याच्या हातावरील 'होम क्वारंटाईन'चा शिक्का पाहून कंपनीत काम करणारे इतर कर्मचारी घाबरले. या प्रकरणाची माहिती मिळताच महापालिकेचे उपायुक्त आणि पोलीस कर्मचारी या कंपनीत पोहचले. सुरुवातीला कंपनीतील अधिकाऱ्यांनी असा कोणी कर्मचारी आत नसल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी आत जाऊन कंपनीच्या आत जाऊन तपास केला असता तो लपून बसलेला आढळला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कलम 188 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.
त्याच्या हातावर असलेल्या शिक्क्यानुसार 17 जूनपर्यंत क्वारंटाइन होणं गरजेचं असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. त्यामुळे त्याला 17 तारखेपर्यंत क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
हेही वाचा : पुण्यातील औंध भागात चोरट्यांनी नऊ दुकाने फोडली; हजारोंचा ऐवज लंपास