पुणे - विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 518 झाली असून अॅक्टिव्ह रुग्ण 404 आहेत, तर एकूण 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 463 बाधित रुग्ण त्यापैकी 42 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरात 120 फ्ल्यू क्लिनिक सुरू करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
सातारा जिल्हयात 11 कोरोनाबाधित रुग्ण असून, 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एका रुग्णाला घरी सोडण्यात आले असून, 8 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. सोलापूर जिल्हयात 12 बाधित रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला तर 11 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. सांगली जिल्हयात 26 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 25 रुग्णांला घरी सोडण्यात आले आहे. तसेच 1 ॲक्टीव्ह रुग्ण आहे.
कोल्हापूर जिल्हयात 6 कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 हजार 781 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 6 हजार 383 चा अहवाल प्राप्त आहे. तर 398 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 5 हजार 846 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 518 नमुन्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकून 120 फ्ल्यू क्लिनिक स्थापन करण्यात आले असून त्यापैकी पुणे महानगरपालिका क्षेत्रात 73 क्लिनिक आहेत तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 47 क्लिनिक आहेत.
नागरिकांनी ताप, सर्दी यासारखी लक्षणे दिसल्यास तत्काळ फ्ल्यू क्लिनिकमध्ये जावून उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.