पुणे Pune District Bank Election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. अजित पवार यांच्या या रिक्त झालेल्या संचालक पदाच्या जागेवर पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत अजित पवार यांचे विश्वासू रणजित तावरे यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला होता राजीनामा : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप आणि राज्यातील पक्ष संघटनेची जबाबदारी यामुळे अपुरा वेळ मिळत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. अजित पवार हे बारामती तालुका 'अ' वर्ग मतदार संघातून बँकेवर गेली 32 वर्षापासून प्रतिनिधीत्व करत होते. मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानं संचालक पद रिक्त झालं होतं.
पार्थ पवार राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर बारामती लोकसभेच्या दृष्टीनं मुलगा पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार हे संचालक पदासाठी अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात होतं. बँकेचे संचालक होऊन जिल्ह्याच्या राजकारणात पार्थ पवार एन्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. पण आत्ता या सर्व राजकीय शक्यतांना पूर्ण विराम मिळाला आहे. बुधवारी बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक पार पडली. यात रणजित तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रणजित तावरे हे बाळासाहेब तावरे यांचे पुतणे असून ते अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असल्याचं बोललं जाते.
रणजीत तावरे यांची बिनविरोध निवड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार रणजीत अशोक तावरे यांचं नाव अ वर्गातून संचालक पदासाठी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी सुचवलं. त्यास आमदार दत्तात्रय भरणे यांनी सूचक तर माजी आमदार रमेश थोरात यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर रणजित तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अजित पवारांचे विश्वासू बाळासाहेब तावरे यांचे रणजित तावरे हे पुतणे आहेत. बाळासाहेब तावरे हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते.
देशातील आहे सर्वोत्तम सहकारी बँक : अजित पवार हे 1991 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक झाले. त्यावेळी बँकेचा एकूण व्यवसाय ५५८ कोटी रुपयांचा होता. तत्कालीन सर्व संचालकांच्या सहकार्यानं आजचा बँकेचा व्यवसाय 20 हजार 714 कोटी रुपयाचा आहे. हा व्यवसाय देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. यापुढंही ही बँक अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सर्वोत्तम बँक म्हणून कार्यरत राहील, असं यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :