पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून ठिकठिकाणी कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. पोलिसांकडून पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना दरोडेखोर अन् पोलिसांत थरार पाहायला मिळाला आहे.
शुक्रवारी रात्रीच्या वेळेस पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. यावेळी गुन्हे शाखेकडील युनिट ३ चे अधिकारी व कर्मचारी , एसीपी वन हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करत होते. रोझरी स्कूलच्या जवळ आठ ते दहा व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. तेव्हा या संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिशेने पोलीस जात असताना एका संशयित आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेने बंदुक रोखली. त्यानंतर आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेने फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे कृत्य पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी सावधानतेचे आरोपींच्या दिशेने गोळीबार केला.यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपीने धारदार शस्त्रे पोलिसांच्या दिशेने फेकून मारल्याने ते जखमी झाले. त्यानंतर पाच आरोपींना पळून जात असताना पोलिसांनी पकडले.
आरोपी सराईत गुन्हेगार- इतर चार ते पाच आरोपी यांच्यावर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. काही आरोपी अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. इतर आरोपींची शोध चालू आहे. तसेच या घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून एक गावठी कट्टा त्यामधील जिवंत चार राऊंड जप्त करण्यात आले आहेत. दोन लोखंडी कोयते, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला आहे.
अटक केल्याने दरोड्याचा गुन्हा टळला -ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासा दरम्यान ते एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले. पोलिसांनी वेळीच आरोपीला अटक केल्याने दरोड्याचा गुन्हा टळला आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत असून या पद्धतीनेच गुन्हेगारांना आळा घालावा, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा-