पुणे - शिवसेनेच्या दोन खासदारांसह २८ कार्यकर्त्यांची आज खेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. खेड तालुक्यातील शिंदे गावातील डाऊ केमिकल कंपनी हटवण्यात यावी, यासाठी पुकारलेल्या आंदोलनानंतर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्यासाठी पुकारलेल्या आंदोलन प्रकरणी सेनेच्या २ खासदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा - भूमिका बदलून काही लोक आज सत्तेत, राज ठाकरेंचा शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला
ही केमिकल कंपनी आमच्या परिसरातून हद्दपार झाली असून न्याय व्यवस्थेने योग्य न्याय मिळवून दिला, अशी भावना यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. या कंपनीमुळे इंद्रायणी नदीसह परिसरात प्रदूषण वाढेल, या भीतीने ग्रामस्थांनी हे आंदोलन पुकारले होते.
हेही वाचा - फ्लिपकार्टसह अॅमेझॉनच्या चौकशीला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती
२००८ साली ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हे गुन्हे मागे घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी लढा सुरू केला होता. यादरम्यान शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि गजानन बाबर यांच्यावर १२ वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात शुक्रवारी साक्षी पुरावे तपासण्यात आले. यावेळी गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींविरुद्ध पुरावे आढळून न आल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.