पुणे - गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत हायप्रोफाईल सोसायटीमध्ये चोऱ्या करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला अटक करण्यात आली. या आरोपीकडून तब्बल ३७ लाख ७३ हजार ६५० रुपये सोन्या-चांदीचे दागिने आणि चोरीचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या आरोपीने पुणे शहर व महाराष्ट्रातील इतर शहरे, तसेच देशातील इतरही काही ठिकाणी १२७ गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी गुन्हेगाराची चौकशी केल्यानंतर पुण्यातील 82 व बाहेरच्या शहरात 45 गुन्हे या आरोपीवर असल्याचे उघड झाले आहे. आरोपीचे नाव सलीम अली हुसेन खान उर्फ मुन्ना कुरेशी उर्फ मोहंमद हमीद हबीब कुरेशी असे आहे. तसेच आरोपीची इतरही वेगवेगळी नावे आहेत. तो चोरलेला माल हैदराबादला घेऊन जात होता. त्याच्या दुसऱ्या साथीदाराला येरवड्यातुन अटक करण्यात आली आहे. ईश्वर उर्फ चिंट्या शिंदेवळ असे त्याचे नाव आहे.
हेही वाचा...मुंबई-लातूर-बिदर एक्सप्रेसमध्ये मारहाण; अत्यंविधीला जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू
पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुद्देमाल विकणाऱ्या पाच आरोपींनाही अटक केली आहे. मुद्देमालामध्ये ८३० ग्रॅम सोन्याचे दागिने, ६ किलो २७५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या आरोपीकडे अजूनही मुद्देमाल असण्याची व त्याचा इतरही गुन्ह्यात समावेश असण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.