पुणे - राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात रिक्षा व्यवसायाला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, या परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य सरकारच्यावतीने पंधराशे रुपयाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या या आर्थिक पॅकेजवर काही रिक्षाचालकांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. तर काहींनी जास्त रक्कमेची मदत जाहीर करायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
'वर्षभरात पहिल्यांदाच मदत जाहीर'
गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आम्हा रिक्षा चालकांना अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. पहिल्या लॉकडाऊनपासून ते आत्तापर्यंत कोणीही आम्हा रिक्षा चालकांना मदत जाहीर केलेली नाही. आत्ता पहिल्यांदाच सरकारकडून आम्हाला मदत जाहीर करण्यात आली आहे. जी रक्कम जाहीर करण्यात आली आहे. ती डायरेक्ट खात्यात जमा व्हायला हवी. कारण आम्हालाही माहीत आहे की, ही रक्कम तुटपुंजी स्वरूपातील आहे. पण जी काही मदत जाहीर झाली आहे, ती योग्य असून ती फक्त डायरेक्ट स्वरूपात जमा व्हायला हवी, अशी अपेक्षा यावेळी रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.
'इतकी मदत करायला हवी होती'
राज्य सरकारनी जी 1500 रुपयांची मदत जाहीर केली आहे. ती कमी असून मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त रक्कम जाहीर करायला हवी होती. 1500 रुपयात आम्ही कसा घरखर्च चालवणार आहोत, मुख्यमंत्र्यांनी आम्हा रिक्षा चालकांना कमीत कमी 5000 रुपयांची मदत करायला हवी होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हा रिक्षाचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. कोणीही मदत केली नाही पण जी काही मदत जाहीर झाली आहे, त्यात थोडी वाढ करायला पाहिजे, असेही रिक्षाचालकांनी सांगितले आहे.
हेही वाचा-'उसेन बोल्ट'लाही मागे टाकतात कर्नाटकचे श्रीनिवास गौडा!