पुणे : महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात दिल्लीमध्ये काही लैंगिक आरोपाचे आणि अत्याचाराचे आरोप केलेले आहेत. हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली गेली होती. परंतु त्यावर कोणतीही दखल घेतली गेली नाही. ब्रिजभूषण यांनी देखील राजीनामा देण्यास नकार दिला. त्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले होते. दिल्लीचे जंतरमंतर देशभरातील स्टार कुस्तीपटूंचा आखाडा बनले.
खेळाडूंच्या मनोधैर्याचे खच्चीकरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचे ब्रिजभूषण सिंह खासदार आहेत. इतर वेळी पंतप्रधान महिला सुरक्षा, बेटी बचाव बेटी पढाव, अशा मोठ्या मोठ्या घोषणा करतात. परंतु त्यांच्याच पक्षाचा एक माणूस अहोरात्र कष्ट करून देशाचे नाव उज्वल करण्यासाठी काम करणाऱ्या या खेळाडूंच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करत आहे. तात्काळ त्यांच्या विरोधात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून, एफआरआय का दाखल होत नाही, असा आमचा प्रश्न आहे. त्वरित यावर सरकारने एफआयआर दाखल करावा, अशी मागणी आपने केली आहे.
खेळाडूंना जाहीर पाठिंबा : पुण्यातील अलका चौकात आपच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी ब्रिजभूषण सिंह यांच्या पोस्टरवर चप्पल मारून, निषेध करून आंदोलन करण्यात आले आहे. क्रीडा या क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी महिला स्त्री पुरुष समानता असताना, असे अनेक प्रकार होतात. पण ते प्रकार पुढे येत नाहीत. या खेळाडूने ही हिंमत केली. इतक्या मोठ्या माणसाविरोधात ते उपोषणाला बसले आहेत, परंतु सरकारचा त्यांच्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. या खेळाडूंना आपण जाहीर पाठिंबा दिला पाहिजे. या खेळाडूंसाठी आपण लढले पाहिजे. यासाठी आम्ही हे आंदोलन करत असल्याचे आम आदमी पक्षातर्फ सांगण्यात आले आहे.