पुणे - दौंड तालुक्यातील यवत जवळील सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल कांचनला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र जीवित हानी टळली. ही आग गॅस सिलिंडरचा भडका उडाल्यामुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये वयोवृद्ध व्यक्तींच्या घरी जाऊन लसीकरण
आग विझवण्यासाठी कुरकुंभ एमआयडीसी व दौंड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले होते. तोपर्यंत नागरिकांनी खासगी टँकरच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला येण्यास उशीर झाल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली होती.
कुरकुंभ एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचा बंब दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आल्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर दौंड नगरपरिषदेचा देखील अग्निशमन दलाचा बंब आल्याने आग सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आली. तोपर्यंत हॉटेल मधील टेबल-खुर्च्या आदी साहित्य, तसेच फर्निचर आगीच्या भक्षस्थानी पडले.
सध्या लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद आहे, मात्र पार्सल सेवा सुरू असल्याने येथे हॉटेलमध्ये कामगार काम करीत होते. घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात महामार्गावर गर्दी केली होती. या गर्दीला पांगवण्यासाठी यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, यानंतर गर्दी पांगवण्यात आली.
हेही वाचा - माळेगाव गोळीबार प्रकरणी पाच तासात चार जण अटकेत