पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अॅड. संजीव पुनाळेकर यांच्या पोलीस कोठडीची मागणी सीबीआयने केली होती. या प्रकरणी न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीआहे. विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
पुनाळेकर आणि डॉ. दाभोलकर यांच्यात मतभेद होते. पुनाळेकर यांनी दाभोळकर यांना सप्टेंबर २०१२ मध्ये पाठविलेले पत्र सीबीआयला मिळाले आहे. पुनाळेकर यांच्या लॅपटॉपमध्ये दाभोलकर नावाचा फोल्डर सापडला आहे. त्यात दाभोलकर यांच्याशी संबंधित अनेक फाईल्स आहेत, त्याचा तपास करायचा आहे. यासह मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे मिळाली आहेत. त्याचा तपास करण्यासाठी पाच दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी सीबीआयचे वकील अॅड प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयात केली. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना पुनाळेकर यांनी शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान त्यांनी जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्यावर सुनावणी सुरू आहे.
सीबीआयला तपासादरम्यान आणखी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पुनाळेकर यांच्या लॅपटॉपमधून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांसंदर्भात त्यांच्याकडे तपास करायचा आहे. या कागदपत्रात नालासोपारा केसचा उल्लेख आहे. न्यायाधीशांबाबत काही निरीक्षणे आहेत. तसेच या पत्रांमध्ये ‘सद्गुरु’ असा उल्लेख आहे. पुनाळेकर हे कोणाला रिपोर्टिंग करत होते, याचा तपास करायचा आहे.
युएपीए कायद्यानुसार सीबीआय ३० दिवसांपर्यंतची कोठडी मागू शकते. या ३० दिवसांच्या कालावधीत आरोपी न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याची पोलीस कोठडी मागता येते. पुनाळेकर यांच्यातर्फे अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अॅड. धर्मराज चंडेल यांनी विरोध केला. सीबीआयचे तपास अधिकारी म्हणून एस. आर. सिंग काम पाहत आहेत.