पुणे - एका तरुणाला बेदम मारहाण करुन धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढल्याची घटना पुण्यात घडली आहे. वाकड पोलिसांनी कारवाई गुंडांवर करताना त्यांची परिसरात धिंड काढली. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा - भरदिवसा व्यापाऱ्याला रोख रक्कमेसह 50 तोळे सोने लुटले, पिंपरी-चिंचवडमधील घटना
मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटात पोलीस गुन्हेगारांची धिंड काढतात, असं दाखविण्यात आलं आहे. चित्रपटातील हे चित्र जरी काल्पनिक असले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र हे खरे ठरले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी काळाखडक येथे एका २८ वर्षीय तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण करुन त्याला धमकावले होते. यासंबधी तरुणाने वाकड पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने हे करत होते. दरम्यान त्यांच्या पथकाने कारवाई करत आरोपी विशाल कसबे, अरविंद साठे, बग्या उर्फ राहुल लष्करे, सूरज पवार या सराईत गुंडांना अटक करून काळखडक येथील परिसरात त्यांची धिंड काढली. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी त्यांचे मोबाईलवर व्हिडिओदेखील केले. पोलिसांनी अशाप्रकारे केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.