पुणे - शेतकरी आणि शेतमजूर जगला की ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहते. यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकास आणि उन्नतीसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केले.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी सचिव एकनाथ डवले,कृषी आयुक्त सुहास दिवसे, आदि उपस्थित होते.यावेळी जिल्हयातील १४ शेतकऱ्यांचा सत्कार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
जावडेकर म्हणाले की, सरकारवर कर्जमाफीची पुन्हा वेळ येणार नाही.शेतजमीन मृदा आरोग्य पत्रिका, शेतकऱ्यांना निम कोटींगयुक्त युरिया पुरवठा, सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतीसाठी मुबलक कर्ज पुरवठा, शेतमालाला किफायतशीर भाव, शेतीसाठी पूरेसा पाणी पुरवठा तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध विकास योजनांमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार असून तो कर्जबाजारी होणार नाही. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्याला कर्जमाफीची गरजच पडणार नाही. स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीची ही सर्वात मोठी योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, छोटया शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणारी ही योजना असून, महाराष्ट्रातील सुमारे एकोणसत्तर लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ७० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये एकूण ४ हजार २०० कोटी रुपयांचा लाभ मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.