पुणे : जागतिक पातळीवर अंतिम सुखाच्या शोधासाठी जे समाज केंद्रस्थानी ठेवून आणि मनुष्य केंद्रस्थानी ठेवून जे प्रयत्न केले गेले, तसेच विज्ञान केंद्रस्थानी ठेवून जे प्रयोग केले गेले तरीही आजही अंतिम सुख सापडलेले नाही. या सर्व मंथनातून जे अमृत निघाले त्या अमृताचा लाभ घेणाऱ्यांनी घेतला. पण शेवटी या प्रयोगातून जे हलाहल बाहेर पडले ते पचवण्याची ताकद कोणाचीच नाही. तर ती ताकद केवळ भारतीय संस्कृतीत आणि भारतीय अध्यात्मात आहे. भारतीय संस्कृती अश्वस्त वृक्षासारखी आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Sarsanghchalak Dr Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केले. 'प्रसाद प्रकाशना'चा अमृतमहोत्सवी सांगता समारंभ (Prasad Prakashan Amrit Mahotsav celebrations) आणि विविध ग्रंथांचा प्रकाशन सोहळा आज बालगंधर्व रंगमंदिर येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
सृष्टीचे चक्र चालत राहणार : डॉ. मोहन भागवत म्हणाले की, सुख हे मनुष्याचे अंतिम ध्येय असते. ते साध्य करण्यासाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत असतो. परंतु या धावपळीत ज्या शाश्वत सुखाचा तो पाठलाग करीत असतो, ते सुख मात्र निसटते. ज्ञान, सुख आणि समृद्धी वाढली तरी अपूर्णतेची एक जाणीव आणि बोच सदैव जाणवत राहिली. सृष्टीचे अस्तित्व चालत आले आहे आणि चालत राहणार आहे. उत्पत्ती आणि विनाशाचे हे चक्र सुरूच राहणार आहे. परंतु, ज्या अंतिम सुखाच्या शोधात मनुष्यप्राणी जागतिकस्तरावर जी धावपळ करीत आहे, त्याचे उत्तर विज्ञानालाही सापडलेले नाही. यासाठी भारतीय अध्यात्मात, वेद-उपनिषदांमध्ये आतला शोध घेण्याची प्रक्रीया सांगितली आहे, त्याच्या मुळाशी सत्याचा अविष्कार आहे. अर्थ, काम, मोक्ष आणि धर्म हे चार पुरूषार्थ आहेत. याच्या प्राप्तीसाठी अतीवादाकडे आपण जात नाही आहोत ना, याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. संस्कृती ही आचार परंपरा आहे. आजही कागदाला किंवा वहीला पाय लागला की आपण नमस्कार करतो, कारण आपण तिला सरस्वती मानतो. जग हे श्रद्धेवर चालते. आता 21 व्या शतकात भारतीय आध्यात्म आणि संस्कृतीचे महत्त्व जगाला पटते आहे. बदलत्या सामाजिक जीवनाचा मागोवा घेत शाश्वत मूल्यांची कास धरून आबाधीत तत्वांशी तडजोड न करता वाटचाल केली पाहिजे.
प्रश्नांची उत्तरे शोधणारी संस्कृती : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आपली संस्कृती ही प्रश्न निर्माण करणारी संस्कृती नसून प्रश्नांची उत्तरे शोधणारी संस्कृती आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत चालला आहे, परंतू आनंदाचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचा सर्व स्तरावर उहापोह, चर्चा आणि अभ्यास होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात पहिल्या दहांमध्ये येतो. परंतु, आता या संस्कृतीवर आक्रमण होत आहे. सोशल अॅनिमल पासून सेल्फीश अॅनिमल असा मनुष्यजातीचा प्रवास येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
नवतेचा ध्यास घेणारी भारतीय संस्कृती : मंदिरशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले की, विविध संस्कृतीचा अभ्यास केला असता भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन संस्कृती असल्याचे आढळून येते. भारतीय संस्कृती ही नीत्यनूतन अशी आहे. मूल्ये जोपासत असतानाच नवतेचा ध्यास घेणारी भारतीय संस्कृती आहे. अशा या संस्कृतीची समृद्धी व्हावी आणि भरभराट व्हावी, अशी अपेक्षा मी आजच्या निमित्ताने व्यक्त करतो. यावेळी व्यासपीठावर मंदिरशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठाच्या संचालिका डॉ. उमा बो़डस आणि प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशनाचे लेखक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुस्तकांचे प्रकाशन : यावेळी प्रसाद प्रकाशनातर्फे डॉ. संकेत पोंक्षे लिखित 'गंधशास्त्र', डॉ. रमा गोळवलकर लिखित 'प्रक्रिया स्वरूपा देवता', आशुतोष बापट लिखित 'भारतीय कलेतील मिथक शिल्पे', डॉ. सच्चिदानंद शेवडे लिखित'मंथन', पांडुरंग भागवत लिखित 'किं एकचि दिसे दुसरे.... मला भावलेली ज्ञानेश्वरी', डॉ. उमा बोडस लिखित 'प्राचीन व्यवस्थापन शास्त्र' या पुस्तकाच्या मुकुंद जोशी अनुवादित हिंदी आवृतीचे आणि निलेश कुष्टे अनुवादित इंग्रजी आवृत्तीचे, तसेच डॉ. अंजली पर्वते लिखित 'साहित्य प्रसादाची अंजुली' आणि वादिराज लिमये लिखित 'श्रीवादिराजयति' या पुस्तकांचे तसेच अनाहत प्रकाशनातर्फे अनिल शिंदे लिखित 'संकल्पना : शोध आणि बोध' आणि डॉ. रमा गोळवलकर लिखित 'शोध अस्मितेचा' आणि 'खर्जूरवाहिका व इतर कथा' या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इंडीक रूटस् या नावाचे रेडिओ चॅनल, तसेच मनोहर जोशी आणि संस्थापक-संपादक य.गो. जोशी आणि प्रसाद प्रकाशनाच्या अमृतमहोत्सवी सांगता समारंभानिमित्त तीन टपाल तिकीटांचे अनावरण करण्यात आले. प्रसाद प्रकाशनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले.