पुणे- देशात पुन्हा भाजपचे सरकार येईल आणि मोदी पंतप्रधान होतील याची जाणीव झाल्यानेच काँग्रेसचा आता तिळपापड होत आहे. म्हणूनच काँग्रेसकडून बेछूट आरोप केले जात आहेत, अशी टीका भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली, ते पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुण्यातून लोकसभेच्या मैदानात असलेल्या गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी प्रकाश जावडेकर यांची मंगळवारी सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. भारतीय जनता पक्षाने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केल्याने काँग्रेससमोर मुद्देच राहिलेले नाहीत. त्यामुळे दिशाहीन झालेलं काँग्रेस नेतृत्व मोदींवर आणि भाजपवर बेछूट आरोप करत आहे.
निरव मोदी आणि मल्ल्या यांची नाव घेतल्याशिवाय काँग्रेसची प्रेस कॉन्फरन्स पूर्ण होत नाही. मात्र, काँग्रेसच्या काळातच या लोकांना पैसे दिले गेले होते. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने ते देशात होते मोदी सरकार आल्यानंतर आपल्यावर कारवाई होईल या भीतीने हे सर्व पळून गेले. मात्र, या सर्व भगोड्यांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगत काँग्रेस आता आपलं पितळ उघडे पडेल या भीतीने ग्रासले आहे. यामुळेच ते भाजपला लक्ष्य करत असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला.