पुणे : राज्यातील विविध मराठा संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. मराठा संघटनांच्या बंदला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आपल्याशी संपर्क साधत बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यानंतर मी या बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणामधून आम्हाला आरक्षण नको, अशी मागणी मराठा आरक्षण समिती करत आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली. महाराष्ट्रामधील सामंजस्य बिघडू नये यासाठी ओबीसीला त्यांचे आणि मराठ्यांना त्यांचे वेगवेगळे आरक्षण द्यावे, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले.
छत्रपतींवर जहरी टीका..
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी राजे आणि उदयन राजे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. या दोघांपैकी एकाही राजाचा बंदला पाठिंबा असल्याचे मी ऐकले नाही. एक राजा बिनडोक आहे, तर दुसऱ्याला इतर विषयांमध्येच रस आहे असे आंबेडकर यावेळी म्हणाले.
एमपीएससीचा निर्णय सरकारने घ्यावा..
एमपीएससी परीक्षांबाबात शासनाने निर्णय घ्यावा आणि सरकारने त्याची अंमलबजावणी करावी, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले.