पुणे - इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पायाभरणी समारंभाचा कार्यक्रम रद्द झाला चांगला हे झाले, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. खरे तर, इंदू मिलची जागा ही परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, जातीय सलोखा याबाबतचे धोरण ठरवण्यासाठी स्टडी सेंटर उभारण्यासाठी ही जागा देण्यात आली होती. मात्र,सध्या तसे होत नाही, याठिकाणी एक आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र उभे राहिले पाहिजे, ही माझी भूमिका असल्याचे आंबेडकर म्हणाले आहेत.
ज्या पद्धतीने इंदू मिलच्या जागेचा गैरवापर होतोय, त्याला मी परवानगी देणार नाही, असे देखील आंबेडकर म्हणाले. अनेक वेळा उदघाटन झाले, मला निमंत्रण आले, मात्र मी गेलो नव्हतो. त्यामुळे पायाभरणी कार्यक्रमाला बोलावले असते तरी, गेलो नसतो, असे देखील आंबेडकर म्हणाले. आगामी काळात पायाभरणी कार्यक्रम करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची नोट वाचून दाखवावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत दोन पुतळे आहेत, आणखी पुतळा कशाला, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. पायाभरणी समारंभ कार्यक्रम रद्द झाला चांगला हे झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बाबासाहेबांना विरोध होता, त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नोटची त्यांना अंमलबजावणी करायची नाही, असे आंंबेडकर म्हणाले.
हेही वाचा-'आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ येत्या काही दिवसात'