पुणे- कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी हातांचे निर्जंतुकीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. जागतिक आरोग्य संघटना तसेच भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने हातांच्या निर्जंतुकीकरणाविषयी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे देशातच नव्हे तर सबंध जगभरात सॅनिटायझरच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्राज इंडस्ट्रीजने अत्याधुनिक संशोधन केंद्रात एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे अल्कोहोलपासून उच्च दर्जाचे सॅनिटायझर्स तयार करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. प्राजने ही माहिती व तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांजवळ पोहचावी यासाठी, सॅनिटायझर्स तयार करण्यासाठीचे सर्व डिझाइन, इंजिनीरिंग आणि फॉर्म्युलेशन पॅकेजविषयीची विनामूल्य माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर दिली आहे.
सॅनिटायझरच्या निर्मितीमध्ये किमान ८०% अल्कोहोल असते. जे विषाणूंना निष्प्रभ बनवते आणि त्यामुळे त्याचा प्रसार रोखला जाऊ शकतो. डिस्टिलरी आणि बॉटलिंग प्लांटमध्ये बनवलेल्या अल्कोहोलच्या मूल्यवर्धित प्रक्रियांपासून सॅनिटायझर्सची निर्मिती करणे शक्य आहे. प्राज कंपनीने जगभरात ७५० हून अधिक तर भारतामध्ये ४५० हून अधिक अल्कोहोल/इथनोल प्रकल्प सबंधी तंत्रज्ञान दिलेले आहे.