दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत असलेल्या विविध समस्यांबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने, औद्योगिक उपविभाग कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहारच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन सहाय्यक अभियंत्याला देण्यात आले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे, बाळासाहेब नानवर, सुमित निंबाळकर यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही केमिकल झोन म्हणून ओळखली जाते. कंपन्यांमधील जल आणि वायूपासून तयार होणारे प्रदूषण पूर्णपणे रोखण्यात यावे. तसेच वसाहतीत असलेल्या कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दौंड तालुक्यातील तरुणांना कंपनीत कामाची संधी द्यावी, त्यांना कायमस्वरूपी काम द्यावे, कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालावा, त्यासाठी उपाय करण्यात यावेत. अशा मागण्यासाठी आज आम्ही आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली बोंबाबोंब आंदोलन केल्याची प्रतिक्रिया प्रहारचे तालुका अध्यक्ष रमेश शितोळे यांनी दिली.
हेही वाचा - जर्किनवरून लावला चोराचा शोध.. 5 सोनसाखळ्यांसह अटक, वाहन चोरीचेही 6 गुन्हे उघड
हेही वाचा - कर्जाचे हप्ते भरण्यासाठी फायनान्स कंपन्यांनी 31 मार्चपर्यंत मुदत द्यावी - मनसे वाहतूक सेना