पुणे - पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी तक्रार देण्यासाठी पुजाची आजी आज पुण्यात दाखल झाल्या आहेत. 7 फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण हिचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूला वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजपातर्फे करण्यात आला होता. दरम्यान, भाजप आणि काही वकीलांच्या संघटनांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, अद्यापही पोलिसांनी या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे आता पूजा चव्हाण हिची चुलत आजी शांताबाई राठोड याप्रकरणी तक्रार देण्यासाठी पुण्यात दाखल झाल्या आहेत.
पूजाच्या नातेवाईक शांतीबाई राठोड यांची प्रतिक्रिया -
गेले 18 दिवस झाले. मात्र, पुजाला न्याय मिळाला नाही. म्हणून तृप्ती देसाईंची मदत घेण्यासाठी पुण्यात आली. या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे संजय राठोडचा आवाज येत आहे. पोलिसांकडे उत्तर नाहीत. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सत्य बाहेर येणार नाही. मात्र, तिचा मृत्यू कसा झाला हे कोणी सांगत नाहीये. उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. मात्र, यातून पळवाट काढली तरी त्यांना शक्य होणार नाही. आज गुन्हा दाखल केला जाणारच, असेही त्या म्हणाल्या.
संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता -
पुण्यात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची भेट घेतली. भेटीनंतर तृप्ती देसाई आणि शांताबाई राठोड दोघेही वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण तक्रार देणार आहेत. त्यामुळे पोलीस आतातरी गुन्हा दाखल करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून स्वरदा बापट यांनी याप्रकरणी तक्रारही दिली आहे. परंतु पोलिसांकडून मात्र अद्यापही त्याची दखल घेतली गेली नाही. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना तपासात दिरंगाई करत असल्याचे आरोप करत धारेवर धरले होते. त्यामुळे आता संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होणार का आणि ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - दातार जेनेटिक्स लॅबला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; टेस्टिंग बंद करण्याचे आदेश