बारामती - खोकल्याचे औषध समजून तणनाशक पिल्याने बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोपट दराडे असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
बारामती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोपट दराडे (वय ४५, अकोले, ता. इंदापूर) येथे वास्तव्यास होते. दराडे आपली ड्युटी बजावून घरी आराम करीत होते. त्यांना दोन-तीन दिवस खोकला येत होता. रात्री त्यांनी खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन केले. दराडे यांना थोड्या वेळानंतर त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांनी घरच्यांना मी हे औषध प्यायलो आहे, असे सांगितले. त्यानंतर कुटुंबातील लोकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखलं केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दराडे यांच्या मृत्यूने गावात हळहळ
दराडे यांचे मूळ गाव इंदापूर तालुक्यातील अकोले हे असून, त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यांनी पोलीस दलात 24 वर्ष सेवा केली. ते गेल्या पाच वर्षांपासून बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - दीपाली चव्हाणचे आणखी एका पत्र आले समोर, प्रकरणात आला नवा ट्विस्ट