बारामती - राज्यात महिला, युवतींबाबत घडणारे गैरप्रकार चिंतेची बाब आहे. राज्य शासन त्याबाबत निश्चित उपाययोजना करेल. येत्या काळात शक्ती कायदा पारित केला जाईल. पोलीस खात्याचा सामान्य जनतेला आधार वाटावा व गुंडांवर जरब बसावी, असे काम केले पाहिजे. चुकीचे काम कोणी करत असेल मग तो माझ्या जवळचा का असेना, त्याच्यावर नियमानुसार कारवाई झालीच पाहिजे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिले.
पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून तयार करण्यात आलेल्या सीएमआयएस साॅफ्टवेअरचे हस्तांतरण पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. मनोज लोहिया, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक अतुल झेंडे, मिलिंद मोहिते, विवेक पाटील, मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, आय मार्क टेक्नाॅलाजीचे संचालक मंगेश शितोळे आदी यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा - धक्कादायक; वाळूची तस्करी करणाऱ्या टेम्पोने कॉन्स्टेबलला चिरडले
गुंडांकडून जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, गुन्हेगारी मोडून काढलीच पाहिजे. माझ्या पक्षाचा चुकीचा वागत असेल तर अॅक्शन घ्या. गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशातून स्वतःचे प्रस्थ वाढविण्याचे काम काहींकडून होते, त्यांना पोलिसांनी ताळ्यावर आणावे. कायदा व सुव्यवस्था राखताना कोणी त्यात हस्तक्षेप करत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असेही पवार म्हणाले.
काय आहे सीएमआयएस -
पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण यांनी संयुक्तपणे हे अॅप तयार केले आहे. रेकाॅर्डवरील गुन्हेगारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाने मदत होणार आहे. या साॅफ्टेवअरमध्ये रेकाॅर्डवरील, मालाविषयक गुन्हेगारांची सर्व माहिती, फोटो भरण्यात आले आहेत. त्यामुळे बदलून आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्याला त्याचे राहण्याचे ठिकाण व मागील रेकाॅर्ड समजू शकेल. या नवीन अॅपमुळे ब्रिटीश काळापासून चालत आलेली हिस्ट्री शीट मागे पडून अचूक माहिती मोबाईलवरच मिळणार आहे.
सीएमआयएसची ठळक वैशिष्ट्ये -
प्रत्येक आरोपीच्या घराचे लोकेशन (अंतरासहित)
आरोपीचा डिजिटल क्रिमिनल फोटो अल्बम
घटकनिहाय व गुन्हे पद्धतीनुसार गुन्हेगारांची यादी
तडीपर गुन्हेगार घटक निहाय माहिती