पुणे - गुरुवारी सायंकाळी चांदणी चौकातील निर्जन परिसरात सापडलेल्या चार महिन्यांच्या बाळाच्या आईवडिलांचा अखेर शोध लागला. माध्यमांमध्ये बातमी पाहिल्यानंतर बाळाच्या वडिलांनी गुरुवारी रात्रीच कोथरूड पोलिसात धाव घेतली आणि ही आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. बाळाची आई रात्रीपासून बेपत्ता होती. तिचाही आज (शुक्रवार) सकाळी शोध लागला असून तिला पोलिसांनी वारजे येथून ताब्यात घेतले.
लक्ष्मी क्षीरसागर असे या बाळाच्या आईचे नाव आहे. चिंतेत असल्यामुळे मुलीला घेऊन घराबाहेर पडले. त्यानंतर चालत वारजे परिसरात गेले आणि भूक लागल्यामुळे वारजे पुलाखाली बसले आणि तिथेच झोपी गेल्याचे बाळाच्या आईने प्राथमिक चौकशी सांगितले. मात्र, तिने बाळाला का टाकून दिले याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी याप्रकरणी आईवर गुन्हा दाखल केला आहे. तिला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले.
हेही वाचा... मालकाचा जीव वाचविण्यासाठी 'झिबली'ची नागाशी झुंज; सापाला मारुनच सोडले प्राण
आंबेगाव परिसरातील तुकाराम क्षीरसागर यांची ही मुलगी आहे. बाळाची बातमी माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने तुकाराम यांना तुमची मुलगी असल्याचे सांगितले. त्यानंतर तुकाराम क्षीरसागर हे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी मुलीचा ताबा घेतला. तुकाराम हे पत्नी लक्ष्मीसह एकत्र कुटुंबात राहत असून ते फर्निचरची कामे करतात. त्यांना यापूर्वीही एक मुलगा आणि मुलगी आहे.
काल, दुपारी तुकाराम कामावर गेले असताना बाळाची आई लक्ष्मी क्षीरसागर ही दवाखान्यात जाते, असे सांगून घराबाहेर पडली होती. ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोधही केली होती. मात्र, ती सापडली नाही. दरम्यान, बाळाची बातमी पाहून तुकाराम यांना धक्का बसला. घरात कोणत्याही प्रकारचे भांडण झाले नाही, तरीही पत्नीने असे का केले. हे माहित नसल्याचे तुकाराम यांनी सांगितले.