पुणे - दौंड तालुक्यातील पाटस गावात विना मास्क, दुचाकीवर वर डबल सीट फिरणाऱ्या अशा सुमारे 41 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 8200 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना काळात बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांवर करण्यात आलेल्या या कारवाईचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
कोरोना या संसर्गजन्य व्हायरसच्या रुग्णांची संख्या पाटस गावात दिवसेंदिवस वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र कोरोना या संसर्गजन्य व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक हे शासकीय नियमांचे उल्लंघन करून विनाकारण गावात फिरत असतात. रस्त्यावर फिरताना मास्क न लावणे, विनाकारण गावात फिरणे, दुचाकीवर एका व्यक्तीस प्रवास करण्यासाठी परवानगी असताना दुचाकीवर दोन - तीन जण प्रवास करणे अशा सर्व व्यक्तीवर पाटस येथील कारखाना चौकात कारवाई करण्यात आली.
मास्क न लावता फिरणाऱ्या आणि दुचाकीवर एक पेक्षा अधिक जण प्रवास करीत असणाऱ्या व्यक्तींना 200 रुपये दंड करण्यात आला आहे. पाटस ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सदर दंडाची रक्कम नागरिकांकडून घेऊन त्यांना सदर रक्कमेच्या पावत्या दिल्या. तसेच नागरिकांना कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ही कारवाई यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, हवालदार संतोष मदने, सुधीर काळे, घनश्याम चव्हाण आणि जाधव पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तर ग्रामपंचायत कर्मचारी बापू खारतोडे, संजय बोरुडे, पांडुरंग निंबाळकर, विशाल कदम, विजय चवलेकर उपस्थित होते.