पुणे - दहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या २ वर्षाच्या चिमुरड्याची पुणे पोलिसांनी ११ तासात सुखरूप सुटका केली आहे. पुण्यातील वडाचीवाडी येथून या चिमुरड्याचे अपहरण झाले होते. पुष्कराज धनवडे, असे या चिमुरड्याचे नाव आहे. अपहरण करणारे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्कराज हा वडाचीवाडी येथे घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली होती. पोलिसांनीही शोधाशोध सुरू केली. परंतु, रात्री दीडपर्यंत काहीही मागमूस लागला नाही. पुष्कराज राहत असलेल्या बंगल्याच्या कंपाउंडमध्ये दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिराच्या आवारात एका बिस्कीट पुड्याखाली एक चिट्ठी आढळली. या चिट्ठीत एक मोबाईल नंबर होता. या मोबाईल नंबरवर पुष्कराजच्या काकांनी फोन केला असता समोरून पुष्कराजचे अपहरण केल्याचे सांगत उद्या सकाळी १० लाखाची खंडणी घेऊन नाशिकला या असे सांगितले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी उंद्री परिसरातच असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या ६० ते ७० कर्मचाऱ्यांनी संपूर्ण उंद्री परिसर पिंजून काढला. शनिवारी पहाटेच्या सुमारास परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या साईटवर पुष्कराज पोलिसांना आढळला. मात्र, अपहरणकर्ते त्या ठिकाणी नव्हते. पुणे पोलिसांनी रात्रभर शोधमोहिम राबवून पुष्कराजची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.