पुणे- जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जुन्नर तालुक्यात मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता, मोठी गर्दी जमवून धुमधडाक्यात लग्न समारंभ पार पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा लग्न समारंभ जुन्नर तालुक्यातील वळगांव आनंद येथे पार पडला असून याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी वधू-वरांसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाचा समुह संसर्ग टाळण्यासाठी विवाह सोहळ्यांना काही अटी आणि शर्ती घालून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या अटी आणि शर्तींचे पालन न करता वडगाव आनंद येथील रुचिका देवकर आणि प्रथमेश वाळुंज हे 19 मे रोजी धूमधडाक्यात विवाह बंधनात अडकले. या दोन प्रतिष्ठित कुटुंबांनी विवाह सोहळा आयोजित केला होता. या लग्न सोहळ्यात जेवणावळीसह लग्नात तुंबळ गर्दी पहायला मिळाली. मात्र, हा विवाह होत असताना वर-वधू पक्षाकडील दोन्ही कुटुंबीयांकडून सरकारच्या नियम आणि अटींचे पालन केले गेले नाही. या लग्नात 100 ते 150 नातेवाईक एकत्र आले होते.
अनेकांनी मास्क न लावता विवाह सोहळ्याला हजेरी लावली. सर्वात धक्कादायक म्हणजे प्रथमेश वाळुंज हा दोन दिवसांपूर्वी नवी मुंबई येथून जुन्नर तालुक्यात आला होता. त्याला क्वारंटाइन करण्यात आले नसल्याचीही बाब समोर आली आहे.
कोरोनाचा समुह संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा पुणे मुंबईसह आता ग्रामीण भागात संसर्ग वाढुन रुग्नांच्या संख्येत भर पडत असताना संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करुन विवाह सोहळा पार पडण्यात आला. विवाह सोहळ्याबाबत माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी वधू-वरांसह कुटुंबियांवर सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, राज्य सरकार कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करत आहे. मात्र, काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना कमी होण्याऐवजी वाढण्याची जास्त शक्यता आहे.