पुणे - सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे. रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. याचा फटका अनेक रुग्णांनाही बसत आहे. अशा काळात पोलीस मात्र, सर्वांना मदत करत आहेत. उपविभागीय पोलीस आधिकारी गजानन टोम्पे आणि राजगुरुनगरचे पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांनी सरकारी गाडीतून प्रसूतीवरुन घरी निघालेली आई आणि बाळाला घरी सोडले.
लॉक डाऊनच्या काळात घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन केल्यानंतर रस्त्यावर वाहनांना परवानगी नाकारली जात आहे. अशा परिस्थितीत प्रसूतीवरुन घरी जाणाऱ्या या महिलेला अडचणीचा सामना करावा लागणार होता. मात्र, त्यावेळी या महिलेच्या आणि बाळाच्या मदतीला पोलीस धाऊन आले. महिलेला सुखरुप घरी पोहचवल्यानंतर महिलेने पोलिसांचे आभार मानले.
हेही वाचा - देशातील कोणीही उपाशी राहणार नाही, मदतीसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज; अर्थमंत्र्यांची माहिती..
कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन आणि पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. याला नागरिकांनी साथ देऊन बाहेर पडू नये. कोरोनाच्या संकटावर आपण मात करु शकतो, असा विश्वास उपविभागीय पोलीस आधिकारी गजानन टोम्पे यांनी व्यक्त केला.