पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गणेश भक्तांना केले आहे. ते 'ईटीव्ही भारत' ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. दरम्यान, शहरातील 50 टक्के गणेश मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे सांगितल्याची त्यांनी माहिती दिली.
जे सार्वजनिक मंडळ गणेशोत्सव साजरा करतील त्यांना कलम 144 प्रमाणे गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले असून मंडळांनीही त्याला होकार दिल्याचे बिष्णोई म्हणाले. तसेच गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना उत्सवादरम्यान रक्तदान शिबिर, प्लझ्मा डोनेशन कॅम्प, असे उपक्रम घेण्याचे आवाहन केल्याचेही आयुक्त बिष्णोई म्हणाले.
तर कारवाई अन् गुन्हाही दाखल होणार
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोणत्याही मंडळाने किंवा कुटुंबाने आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन सार्वजनिकरित्या न करता घरी किंवा एका हौदात करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करत जर कोणी मिरवणूक काढली व सार्वजनिकरित्या विसर्जन करताना आढळले तर त्यांच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई यांनी दिला आहे.
हेही वाचा - गतवर्षीच्या तुलनेत टाळेबंदीत आत्महत्यांचे प्रमाण १३ टक्क्यांनी कमी