पुणे - गस्तीवर असणार्या पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून साडेपाच लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 54 मोबाईल जप्त करण्यात आले. येडप्पा हिरेकरू (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिसांना एक व्यक्ती चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांनी कोंढव्यातील कमला चौक येथे सापळा रचला. यावेळी त्यांना एक तरुण संशयास्पद अवस्थेत वावरताना दिसला. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु, पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असणाऱ्या काळ्या रंगाच्या पिशवीत काय आहे? अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा धाक दाखवत पिशवी ताब्यात घेतली. तपासणी केली असता, त्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे 54 मोबाईल फोन आढळले. या मोबाईल फोनची एकूण किंमत 5 लाख 47 हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याने हे मोबाइल चोरल्याचे कबूल केले. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.