पुणे - पैसे घेऊन बनावट कागदपत्र तयार करून देणे आणि त्याआधारे नर्सरी ते पहिली या वर्गात आरटीई योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. हडपसर पोलिसांनी या टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून लॅपटॉप, बनावट रेशनकार्ड, कलर प्रिंटर, बनावट शिक्के जप्त करण्यात आले. दीपक विठ्ठल गरुड (36), सचिन रतन बहिरट (36), सुधीर अभिमन्यू काकडे (35), ऋषिकेश भानुदास ढमाले (28) आणि अनिकेत सुरेश शिंदे (26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हडपसर परिसरातील एका हॉटेलमध्ये असणारे काही इसम पालकांकडून पैसे घेऊन बनावट कागदपत्र तयार करून, त्यांच्या मुलांना आरटीई योजनेअंतर्गत शाळेत प्रवेश मिळवून देत होते. या प्रकरणी शासनाची फसवणूक करत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांना मिळाली. त्यानुसार हडपसर पोलिसांनी हॉटेल मेघराज येथे छापा टाकून वरील आरोपींना अटक केली.
महाराष्ट्र शासनाची आरटीई योजना ही दारिद्रयरेषेखालील आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता आहे. या योजनेअंतर्गत एकदा प्रवेश मिळाला की आठवी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळते. यात नामांकीत शाळेत शासनाच्या 25 टक्के जागा राखीव असतात. आरोपी या जागांवर प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट कागदपत्र तयार करून प्रवेश मिळवून देत होते. आरोपींनी मागील वर्षीही काही मुलांचे प्रवेश करून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करीत आहेत.