पुणे - कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रांजणगाव औद्योगिक वसाहत बंद ठेवण्यात आली होती. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या. या कामगारांच्या धैर्याला रांजणगाव पोलीसांनी सलामी देऊन कंपनीसमोर जाऊन टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले. तर, या कामगारांनी आता "कोरोना से डरना नही तो लढना है" असे म्हणत कोरोनाशी दोन हात करुन सुरू केलेली ही लढाई पुढील काळातही यशस्वी सुरू रहाणार असल्याचे ब्रिटानिया कंपनीच्या व्यवस्थापक निर्मला प्रसाद यांनी सांगितले.
गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद होत्या. मात्र, लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये कामगारांनी अत्यावश्यक व रोजच्या वापरातील गरजेच्या वस्तुंचा तुटवडा जाणवू नये यासाठी कमी कामगारांवरही आपली सेवा सुरू ठेवली. कोरोना से डरने का समय नही तो लढने का है" असे म्हणत त्यांनी काम सुरू ठेवले होते. त्यामुळे हे सर्व कामगार कोरोना लढाईतील एक योद्धा म्हणून आपली जबाबदारी पार पाडत होते. कामगारांच्या लढाईला पोलिसांनी साथ देऊ टाळ्या वाजवत सलामी दिली आहे.
लॉकडाऊननंतर आता सर्व कंपन्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कामगारांच्या कार्याचा गौरव होत असताना या परिसरातील सर्व कामगारांनी कोरोनाला न घाबरता कामावर हजर होऊन आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले आहे.