पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात आले आहेत. त्यांना मणिपूर हिंसाचारावरून काळे झेंडे दाखवून काँग्रेसकडून विरोध करण्यात आलेला आहे. काँग्रेसकडून हे आंदोलन पुण्यातील अभिनव चौकामध्ये करण्यात आले. या आंदोलनाचे आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी यांनी नेतृत्व केले. यावेळी बळजबरीने पोलिसांचा वापर करून आम्हाला ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे. पोलिसांचा उपयोग करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नव्हे तर क्राईम मिनिस्टर, 'मोदी गो बॅक' असे पोस्टर हातात घेऊन निषेध केला जात आहे.
मोदी यांच्या दौऱ्याला विरोध : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या आघाडीने आधीच आपली भूमिका जाहीर केली होती. त्याप्रमाणे आज आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी हे कार्यकर्ते अभिनव चौकात काळे कपडे घालून त्याच्यावर मणिपूरचा उल्लेख करून आंदोलन करत होते. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर पायी चालत निघालेले असताना त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अभिनव चौकात पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ झटापट चालू होती. अखेर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलेले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिलेली आहे.
पंतप्रधानांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यात सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येत पंतप्रधानांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर निषेध करण्यात येणार असल्याचा ठराव विरोधी पक्षांच्या बैठकीत करण्यात आला होता. नरेंद्र मोदी गो बॅक मणिपूर आणि फेस द पार्लमेंट, अशी या आंदोलनाची टॅगलाईन सुद्धा तयार करण्यात आली होती. यासंदर्भात माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली होती. महात्मा फुले मंडई येथे विरोधकांच्या वतीने 'गो बॅक मोदी' म्हणत आंदोलन केले जात आहे. मणिपूरच्या घटनेच्या निषेधार्थ बॅनर हातात घेवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :
- PM Modi Pune Visit: पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर, 'असे' आहे दिवसभरातील वेळापत्रक
- PM Modi Pune Visit : पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर; मेट्रोला दाखवणार हिरवा झेंडा, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम
- PM Modi Pune Visit: पंतप्रधानांचा आज पुणे दौरा; ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त, रस्ते अजूनही वाहतुकीसाठी खुले