पुणे - शहरात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दिवसाला चार हजारपेक्षा अधिक कोरोना बाधित आढळत आहेत. बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्माची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. मात्र, प्लाझ्मासाठी रक्तपेढ्यांना 'कोणी प्लाझ्मा देतं का, प्लाझ्मा' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पुणे शहरात आवश्यक असलेल्या प्लाझ्मापैकी फक्त 10 ते 15 टक्केच प्लाझ्मा गोळा होत आहेत.
प्लाझ्मा दानाकडे तरूणांनी फिरवली पाठ -
पुणे शहरात कोरोनाच्या नवी स्ट्रेनमुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात बाधित होत आहे. मात्र, त्यांचे बरे होण्याचे प्रमाण देखील जास्तच आहे. त्यामुळे हे तरूण प्लाझ्मा दान करू शकतात. असे असले तरी प्लाझ्मा दानासाठी तरूण वर्ग पुढे येत नाही. ज्यांना गरज आहे त्यांच्याच नात्यातील लोक पुढे येऊन प्लाझ्मा दान करत आहेत. जे लोक रक्तदानाशी संलग्न आहेत असेच लोक कोरोना झाल्यानंतर पाच-पाच वेळा प्लाझ्मा दान करत आहेत. नवीन प्लाझ्मा दात्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे.
15 दिवसानंतर कोरोनामुक्त रूग्ण करू शकतो प्लाझ्मादान -
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णाच्या शरीरात 28 दिवसानंतर अँटी बॉडीज् तयार होतात. कोरोनामुक्त झालेला रूग्ण आपल्या प्रतिकारशक्तीनुसार 15 दिवसानंतर प्लाझ्मादान करू शकतो. रक्तदानामध्ये 3 महिन्यानंतर रक्तदान करू शकतो, तसाच नियम प्लाझ्माबाबतही आहे.
रक्तपेढ्यांमध्ये दिवसाला फक्त 4 ते 5 प्लाझ्मा -
पुणे शहरात 31 पेक्षा जास्त रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये दिवसाला फक्त 4 ते 5 प्लाझ्मादान होत आहे. सध्या शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्लाझ्माची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. मात्र, गरजेपेक्षा खूपच कमी प्लाझ्मा गोळा होत आहेत.
नागरिकांनी प्लाझ्मादानासाठी पुढे यावे -
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात प्लाझ्माचा तुटवडा आहे. कोरोना बरा झाला तरी नागरिक प्लाझ्मा दान करण्यासाठी अजूनही घाबरत आहे. ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. यामुळे रूग्णाला कोणताही त्रास होत नाही. तरी देखील प्लाझ्मा दानासाठी नागरिक पुढे येत नाहीत. नागरिकांनी प्लाझ्मा दानसाठी पुढे यावे, असे आवाहन सह्याद्री हॉस्पिटलच्या पीआरओ सुजाता नाईक यांनी केले आहे.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही; पालकमंत्री छगन भुजबळांनी केले स्पष्ट