पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्प हे 31 मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहर रेड झोनमधून वगळण्यात आल्यानंतर पिंपरी कॅम्पात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. तसेच प्रशासनाने कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने निदर्शनास आले होते.
शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून पिंपरी कॅम्पकडे पाहिले जाते. या ठिकाणी कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल यांची दुकाने आहेत. रेड झोनमधून शहराला वगळल्यानंतर सम-विषम तारखेनुसार दुकाने उघडण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, नियमांचे पालन झाले नाही. तसेच नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, तोंडाला मास्क न वापरणे अशा बाबी निदर्शनास आल्याने 31 मेपर्यंत येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे कोरोना विषाणूचा धोका वाढणार नाही.
पिंपरीतील भाटनगर, बौद्धनगर, वैष्णदेवी माता मंदिर परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. या प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळील पिंपरी कॅम्प, शगून चौक, कराची चौक, आर्य समाज चौक, साई चौक, गेलॉर्ड चौक, रमाबाई आंबेडकर चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक या बाजारपेठेतील दुकाने आणि ग्राहकांकडून अटी-शर्तीचे उल्लंघन होत होते.