पुणे (पिंपरी-चिंचवड) - १३ जूनला मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. वारकरी संप्रदायाच्या उपासकांनी आणि भाविकांनी आळंदीमध्ये न येता घरी राहूनच पालखी सोहळ्याची पूजा करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवडच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी केले. तरी देखील भाविकांनी आळंदीमध्ये प्रवेश केल्यास त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येईल. तसेच कलम १४४ नुसार कारवाई केली जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
ज्ञानेश्वर मंदिराचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. करोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांच्या मदतीची आणि सहकार्याची अपेक्षा आहे. आळंदीतील इतर धार्मिक स्थळे, हॉटेल्स, लॉज बंद करण्यात आले आहेत. शासनाने परवानगी दिलेल्यानुसार विश्वस्त, सेवेकरी आणि जे वारकरी मंदिरातच राहतात त्यांच्यामार्फत पालखी सोहळ्याचे प्रस्थान केले जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.